Monday, November 12, 2012

विषारी वायू व कानठळ्या बसवणा-या फटाक्यांची (विकृत) 'हॅपी दिवाळी' विरूध्द सनईच्या मंगल सुरावटीतील, दिव्यांच्या.. रांगोळ्यांच्या.. उटण्याच्या सुगंधीत वातावरणातील (हरवलेली) 'शुभ दीपावली'



लोकांना विकृती आणि आनंद ह्याच्यातला फरक खरंच कळेनासा झाला आहे.. किंबहुना विकृती हेच आनंदाचे परिमाण झाले आहे.. कानठळ्या बसवणा-या, विषारी वायू पसरवून वातावरण प्रदूषीत करणा-या फटाके वाजवण्याच्या विकृत मनोवृत्तीत लोक काय आनंद शोधतात तेच कळत नाही..  खरा आनंद कधीच संपलाय आता उरलाय तो कानाचे पडदे फाटवणारा फटाक्यांचा आवाज आणि त्या फटाक्यातून हवेत निर्माण झालेला विषारी वायूचा थर.. ह्याचेच नाव 'हॅपी दिवाळी' असेल..
प्रसन्नतेची.. पहाटेच्या शांत वातावरणात उस्ताद बिसमिल्लांच्या सनईच्या सुरावटीतील.. उटण्याच्या सुगंधातील.. दिव्यांची आरास असणारी मनमोहक दिवाळी कधीच गायब झाले... त्या 'शुभ दीपावली' सारखी.. आताच्या काळातली ही 'हॅपी दिवाळी' भलतीच जीवघेणी व  विकृत आहे..
अशी ही नकोशी झालेली 'हॅपी दिवाळी' व ह्या गोंगाटात.. गदारोळात, विषारी वायू्च्या वलयात घुसमटलेली.. गुदमरलेली.. माझी 'शुभ दीपावली'..

बापरे... अजून लक्ष्मी पूजन बाकी आहे.. ती संध्याकाळ अख्खे पुणे शहर म्हणजे हिटलरच्या काळात असलेले गॅस चेंबर झालेले असते.. हिटलरने ही आजच्या काळातली लक्ष्मी पूजनची संध्याकाळ पाहिली असती तर त्याने गॅस चेंबर तयार न करता त्याऐवजी रोज ही आजच्या काळातली लक्ष्मी पूजनच्या संध्याकाळची दिवाळी साजरी करायचे आदेश दिले असते.. नक्कीच..
अतिशयोक्ती करतोय असं वाटतंय का... तर मग तुम्ही स्वतःच अनुभवा..
१. लक्ष्मी पुजनच्या संध्याकाळी अख्ख्या पुण्यात फिरा (त्या आधी स्वतःचा विमा उतरवायला विसरू नका)
२. लक्ष्मी पुजनच्या नंतरची सकाळ दिवे घाट किंवा सर्वात उत्तम म्हणजे बोपदेव घाटात जाऊन पुण्याचे दर्शन घ्या... पुण्यावर पसरलेला धुराचा थर जो तुम्हाला दिसेल तोच सर्वकाही सांगून जाईल... अश्या ह्या वातावरणात स्वाईन फ्लू होणार नाही तर काय... त्यामुळे तुम्हाला लखलाभ असो ही आजची 'गॅस चेंबरवाली' 'हॅपी दिवाळी'... मी मात्र शोधतोय माझी हरवलेली 'शुभ दीपावली..'

Saturday, February 2, 2008

मनोगत

नमस्कार,
"ब्लॉग" ह्या संकल्पनेने प्रत्येक नेटकराचं आयुष्य व्यापून टाकलंय. ऑर्कुट हा जसा आपल्या identity चा अविभाज्य भाग बनला आहे त्याच प्रमाणे "ब्लॉग" ही संकल्पना बर्याच नेटकारांची जिव्हाळ्याची किंबहूना "व्यक्त" होण्याकरिता म्हणून "गरज" बनली आहे.
मी स्वत: ह्या ब्लॉगर्सच्या दुनियेत भटकंती करत असतो. गेलं 1.5 वर्षं माझं ब्लॉगर खातं धूळ खात पडलं आहे पण "काय लिहावं" हा गहन प्रश्न माझ्यासमोर असायचा पण आज असाच एक ब्लॉग वाचला आणि म्हटलं "च्यायला, (sorry, ही शिवी नाहीये हो, हा शब्द आता आपल्या बोलीभाषेतला एक अविभाज्य घटक आहे) आज लिखाणाची सुरूवात करू." आता सुरूवात तर केली आहे.... आता पुढे बघू हे लिखाण काय वळण घेतं ते.
आत्ता इथेच थांबतो.